Satyaswarup Sagunabai

Satyaswarup Sagunabai


Book Preview


₹200.00 ₹235.00
Price in USD: $2.15

सत्यस्वरूप सगुणाबाई क्षीरसागर :- इतिहासाच्या अंधारातून उजेडात येणारी मातृछाया भारतीय समाजक्रांतीचा इतिहास लिहिताना महात्मा जोतिराव फुले यांचे नाव केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक विचारप्रणाली, एक युगप्रवर्तक क्रांती म्हणून समोर येते. त्यांनी उभा केलेला सामाजिक संघर्ष हा एकाकी नव्हता. तर त्या संघर्षामागे अनेक ज्ञात-अज्ञात हात, मायेची सावली, बळ देणारी मने आणि त्यागमय आयुष्ये होती. दुर्दैवाने इतिहासाने त्यातील बहुतेकांना मौनात ढकलले. अशाच मौनात गेलेल्या, पण फुले विचारधारेच्या मुळाशी असलेल्या एका थोर स्त्रीचे जीवन म्हणजे 'सत्यस्वरूप सगुणाबाई क्षीरसागर'. या अन्यायग्रस्त इतिहासाला शब्द देण्याचे, संशोधनातून उजेडात आणण्याचे महत्त्वाचे कार्य दिनकर काकडे यांनी आपल्या या चरित्रग्रंथातून केले आहे. म्हणूनच 'सत्यस्वरूप सगुणाबाई क्षीरसागर' हा केवळ चरित्रग्रंथ राहत नाही, तर तो इतिहासदुरुस्तीचा जाहीरनामा ठरतो. सावित्रीबाई फुले, सयाजीराव महाराज यांसारखी नावे आज सामाजिक सुधारणांच्या इतिहासात सन्मानाने घेतली जातात. मात्र, ज्यांनी प्रत्यक्ष कृतीतून फुलेंना घडवले, त्यांना इतिहासाने दुय्यम ठरवले. सगुणाबाई क्षीरसागर याच दुर्दैवी यादीतील एक नाव. जोतीराव अवघ्या आठ महिन्यांचे असताना त्यांच्या आई चिमणाबाईंचे निधन झाले. त्याक्षणी मावसबहीण सगुणाबाई ‘आई’ झाल्या. त्यांनी केवळ जोतीरावांचे पालनपोषण केले नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर संस्कार घडवले. पुढे जोतीरावांच्या शिक्षणावर संकट आले, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या पहिल्या व्यक्ती सगुणाबाईच होत्या. एका ब्राह्मण शिक्षकाच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी जोतिरावांचे शिक्षण बंद केले, ही घटना फुले चरित्रात येते. पण त्या निर्णयाविरुद्ध ठाम उभ्या राहणाऱ्या सगुणाबाईंचा उल्लेख मात्र क्वचितच आढळतो. इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरी काम करत असताना शिक्षणाचे महत्त्व ओळखलेल्या सगुणाबाईंनीच जोतिरावांचे शिक्षण पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले. लिजीटसाहेब आणि गफारबेग मुन्शी यांच्यामार्फत गोविंदरावांचे मन परिवर्तन घडवून आणणे, हा सगुणाबाईंच्या दूरदृष्टीचा, धैर्याचा आणि बुद्धिमत्तेचा पुरावा आहे. जोतिराव शिकले, म्हणूनच ते समाजक्रांती करू शकले हा दुवा लेखक अत्यंत प्रभावीपणे अधोरेखित करतो. जोतीरावांचे लग्न सावित्रीबाईंसारख्या सत्वशील, त्यागी, ध्येयवादी स्त्रीशी घडवून आणण्यातही सगुणाबाईंची भूमिका निर्णायक होती. त्यामुळे फुले दांपत्य हे केवळ योगायोगाने नव्हे, तर सजग सामाजिक निवडीमधून घडलेले क्रांतिकारक युगल ठरते, हे लेखक प्रभावीपणे मांडतात. सुरुवातीला निरक्षर असलेल्या सगुणाबाई सावित्रीबाईंसोबत शिकल्या, शिक्षिका झाल्या आणि फुरसुंगी येथील शाळेत अध्यापनाची जबाबदारी स्वीकारली. स्त्री शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात स्वतःला झोकून देणाऱ्या या स्त्रीचा मृत्यूही कॉलऱ्याच्या साथीत सेवा करतानाच झाला. हा अंत वाचकाच्या मनात खोल हळहळ निर्माण करतो. दिनकर काकडे यांचे लेखन केवळ भावनिक नाही, तर ते संशोधनाधारित, संदर्भसंपन्न आणि चिकित्सक आहे. परंपरावादी मानसिकतेच्या समाजात परिवर्तनवादी विषयावर लिहिणे हे आजही आव्हानात्मक आहे. त्यासाठी पदरमोड, भटकंती, अपूर्ण संदर्भांशी झुंज देणे हे सारे कष्ट लेखकाने घेतलेले स्पष्ट जाणवतात. हा ग्रंथ लिहिताना लेखकाने इतिहासाने दुर्लक्षित केलेल्या व्यक्तींवर होणारा अन्याय ओळखला आहे आणि तो अन्याय काही अंशी तरी दुरुस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. म्हणूनच हा ग्रंथ केवळ सगुणाबाईंचे चरित्र न राहता, इतिहासाच्या न्यायालयातील साक्ष ठरतो. सत्यस्वरूप सगुणाबाई क्षीरसागर हा ग्रंथ वाचल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे जाणवते की, इतिहास घडवणाऱ्यांवरच इतिहास सर्वाधिक अन्याय करतो. सगुणाबाई क्षीरसागर या फुले चळवळीच्या केवळ साक्षीदार नव्हत्या, तर त्या तिच्या मूलाधार होत्या. आईची माया, शिक्षकाची दृष्टी, क्रांतिकारकाची निष्ठा आणि सेवाव्रतीची अखंड भावना या साऱ्या गुणांचे मूर्त रूप म्हणजे सगुणाबाई. दिनकर काकडे यांचा हा ग्रंथ म्हणूनच वाचनीय नाही, तर अनिवार्य आहे. तो प्रत्येक अभ्यासकाने, शिक्षकाने, सामाजिक कार्यकर्त्याने आणि फुले विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवा. -दिलीप भोसले

RELATED BOOKS

₹40.00 ₹60.00 33% Off
₹60.00 ₹80.00 25% Off
₹150.00 ₹250.00 40% Off
₹300.00 ₹400.00 25% Off
₹80.00 ₹100.00 20% Off
₹230.00 ₹250.00 8% Off