राजमाता भीमाबाई रामजी आंबेडकर :– युगपुरुष घडविणाऱ्या मातृत्वाचा दस्तऐवज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व बौद्धिक कार्य जागतिक पातळीवर अजरामर झाले आहे. भारतीय लोकशाही, संविधान, समता, सामाजिक न्याय आणि मानवी हक्क यांच्या इतिहासात ते एक युगप्रवर्तक म्हणून उभे राहतात. तथापि, अशा लोकोत्तर युगपुरुषाच्या निर्मितीमागे उभ्या असलेल्या मातृत्वाचा, त्यागाचा आणि संस्कारांचा इतिहास बहुतेक वेळा दुर्लक्षित राहतो. हीच पोकळी भरून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दिनकर काकडे लिखित 'राजमाता भीमाबाई रामजी आंबेडकर' या चरित्रग्रंथाने केले आहे. या पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे राजमाता भीमाबाई. भीमाबाई रामजी आंबेडकर. ज्यांनी दैन्य, संघर्ष, आजारपण आणि सामाजिक विषमतेच्या छायेतून एका महान पुत्राला घडविले. ‘राजमाता’ ही संज्ञा येथे केवळ अलंकारिक नाही, तर ती सामाजिक अर्थाने अत्यंत सार्थ ठरते. बाबासाहेब प्रत्यक्ष राजे नव्हते, तरी ते कोट्यवधी शोषित-वंचितांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेले अनभिषिक्त राजे होते; आणि अशा लोकराजाची जननी ही राजमाताच ठरते. हा विचार लेखकाने सुस्पष्टपणे अधोरेखित केला आहे. लेखक दिनकर काकडे यांनी भीमाबाईंच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचे, त्यांच्या घराण्यातील शिस्त, शिक्षणाची ओढ, कर्तृत्व आणि स्त्री-पुरुष समतेची जाणीव यांचे सखोल चित्रण केले आहे. लक्ष्मणराव सपकाळ यांच्यासारख्या शिस्तप्रिय, कर्तबगार वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या भीमाबाईंच्या जीवनप्रवासात विवाहानंतरही संघर्ष कमी झाला नाही. अपत्यवियोग, आर्थिक अडचणी, स्थलांतर, सामाजिक ताणतणाव आणि आजारपण या साऱ्या दुःखछटांतून जात असतानाही त्यांनी मातृत्वाचे कर्तव्य, संयम आणि दूरदृष्टी कधीही सोडली नाही. ग्रंथातील विशेष बलस्थान म्हणजे भीमाबाईंच्या मातृत्वाचा सामाजिक अर्थ लेखकाने अत्यंत संवेदनशीलतेने उलगडला आहे. बाबासाहेबांच्या बालपणीचे संस्कार, शिक्षणाबद्दलची जाणीव, अन्यायाविरुद्धची चीड आणि आत्मसन्मानाची जिद्द या साऱ्यांची बीजे भीमाबाईंच्या विचारविश्वात रोवलेली दिसतात. त्यामुळे बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ वैयक्तिक प्रतिभेचे फलित नसून, एका त्यागमूर्ती मातेच्या संस्कारांची देण आहे, हे लेखक ठामपणे मांडतात. या चरित्रग्रंथाची भाषा ओघवती, भावस्पर्शी आणि अभ्यासपूर्ण आहे. प्रसंगानुरूप संवाद, सामाजिक संदर्भांची गुंफण आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यांमुळे ग्रंथाला केवळ भावनिकच नव्हे तर संशोधनात्मक मूल्यही प्राप्त होते. विशेषतः स्त्रीचरित्र लेखनात आवश्यक असलेली संवेदनशीलता, सहानुभूती आणि अंतर्मुख दृष्टी लेखकाने यथोचित जपली आहे. महात्मा फुलेंच्या समताधिष्ठित समाजरचनेच्या विचारांचा संदर्भ देत, लेखक जातीय विषमतेविरुद्धच्या संघर्षाची व्यापक परंपरा अधोरेखित करतात. या परंपरेत भीमाबाईंचे मातृत्व हे केवळ कौटुंबिक चौकटीत न अडकता सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेशी जोडले जाते हीच या ग्रंथाची वैचारिक उंची आहे. एकंदर पाहता, 'राजमाता भीमाबाई रामजी आंबेडकर' हा ग्रंथ केवळ एका महान पुरुषाच्या आईचे चरित्र नाही, तर युगनिर्मितीमध्ये मातृत्वाची भूमिका काय असते याचे सखोल, भावनिक आणि विचारप्रवर्तक दर्शन घडवणारा दस्तऐवज आहे. स्त्री अभ्यास, दलित अध्ययन, सामाजिक इतिहास आणि चरित्र साहित्य या सर्व क्षेत्रांतील अभ्यासकांसाठी हा ग्रंथ अनिवार्य ठरावा असा आहे. वाचकांनी या पुस्तकाचे मनःपूर्वक स्वागत करावे, हीच अपेक्षा. -दिलीप भोसले